बारामती -विषमुक्त, सेंद्रीय शेतीमुळे रासायनिक खतांच्या तुलनेत उत्पादन कमी मिळते. परंतु आपला दृष्टीकोन मात्र झटकन उत्पादन मिळाले पाहिजे हा असतो. आज भारतासह जगामध्ये विषमुक्त भाजीपाला व अन्नधान्यासाठी लोक पाहिजे ती किंमत द्यायला तयार आहेत. त्यामुळे तुलनेत उत्पादन कमी मिळाले तर किंमत चांगली मिळणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान नाही. त्यामुळे विषमुक्त शेतीकडे शेतकऱ्यांनी वळण्याचे धाडस दाखवले पाहिजे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
काय म्हणाले शरद पवार -
राज्यातील दोन तालुक्यांची नावे मी आत्ता सांगत नाही. तेथील शेतकरी भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. किटकनाशकांच्या बंदोबस्तासाठी तेथे औषध फवारणी सर्रास केली जाते. त्यामुळे तेथे कर्करोगाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येऊ लागले आहेत, असेही ते म्हणाले. तसेच ५० वर्षांपूर्वी काटेवाडीत आपल्या घरी असलेल्या द्राक्ष बागेचे उदाहरण सांगताना त्यावेळी रोज आम्हाला बागेवर औषध फवारणीचे काम करावे लागे. अशी औषधे अपायकारक आहेत. त्यामुळे ती शरीरात गेल्यावर अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. राज्यात माण तालुक्यातील मूग, आजऱ्यातील घणसाळ तांदूळ लोकप्रिय आहे. मंगळवेढ्याची मालदांडी ज्वारी आजही प्रसिद्ध आहे. त्यावर फवारण्या होत नाहीत. त्यामुळे त्या शरीराला उपकारक ठरतात, असे पवार म्हणाले.
हेही वाचा -बुलडाणा :...म्हणून भाजपाच्या 'या' महिला आमदाराने साजरी केली 'काळी दिवाळी'