पुणे - पुण्यातील दांडेकर पूल येथील आंबिल ओढा वसाहतीवर महापालिकेच्या वतीने 24 जून रोजी झालेल्या कारवाईच्या स्थगितीला आज (बुधवारी) न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे. 19 जुलैपर्यंत या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. महापालिका येथील न्यायालयात झालेल्या सुनावणीत ही मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती दलित कोब्राचे अध्यक्ष अॅडव्होकेट भाई चव्हाण यांनी दिली आहे.
आंबिल ओढ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहेत. ओढ्यामध्ये भर टाकून बांधकाम करण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात आसपासच्या परिसरात पाणी तुंबते. यामुळे मोठे नुकसान होते, असे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळेच येथील अतिक्रमण हटविण्याची नोटीस महापालिकेने काढली होती. त्यानुसार 24 जून रोजी महापालिकेच्यावतीने येथे कारवाई करण्यात आली होती. मात्र कारवाईच्या वेळेतच स्थानिकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर कारवाईला स्थगिती देण्यात आली होती. त्यांनतर आज (बुधवारी) महापालिकेच्या न्यायालयात सुनावणी पार पडली.