मुंबई - जलदगती रेल्वेतील पार्सल डब्यातून वाहतूक होणारे सामान लंपास करणाऱ्या सराईत चोराला रेल्वे पोलीस दलाने अटक केली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून पार्सल चोरी करणाऱ्या 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. अटकेत असलेल्या आरोपींमधील शंकर नायडू उर्फ जम्बो नामक आरोपीवर देशभरातील रेल्वे विभागांत 100 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. देशभरातील प्रत्येक विभागातील आरपीएफला त्याचा शोध होता.
सर्व रेल्वे गाड्यांतील पार्सल डब्यात चोरी करण्यासाठी या सराईत गुन्हेगाराने स्वतःची देशभरात टोळी निर्माण केली होती. प्रत्येक राज्यात बनवलेल्या टोळीतील व्यक्तीला तो त्याच्या कामाप्रमाणे पैसे वाटप करत होता.
संबंधित टोळी काही महिन्यांपासून कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांमधून पार्सल डब्यातील सामान सायन ते दादर रेल्वे स्थानकांदरम्यान रात्रीच्या वेळेस बाहेर फेकून लुटत होते. या प्रकरणी पोलिसांनी शंकर नायडूला चेन्नईतून तसेच विजय जाधव व अहमद अकबर अन्सारी, शाफिक शहा, दलपत चौधरी व सैयद मोईद्दीन मेहबूब या आरोपींना ताब्यात घेतले आहे. हे आरोपी घाटकोपर स्थानकावरून कल्याणला लोकलने प्रवास करत होते.