पुणे - राष्ट्रीय स्मारक फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेची भूमीसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन या कामास तात्काळ प्रारंभ करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी आज ( दि. 27 ) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले. मुलींची पहिली शाळा असलेला भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करणे तसेच या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा उभारण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
पुणे येथील राष्ट्रीय स्मारक असलेल्या फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाबाबत आणि भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्रा. हरी नरके आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांनी फुलेवाडा आणि स्मारकाचे विस्तारीकरण लवकरच भूसंपादन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या. त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात येईल, असे आयुक्त विक्रम कुमार आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा : छगन भुजबळ