पुणे- आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटना 49 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. याबाबत 1 ऑगस्टपर्यंत आघाडी तसेच शिवसेना-भाजपसोडून इतर पर्यायाचा विचार करणार असल्याचे संघटनेच्या कार्यकारणी बैठकीत ठरवण्यात आल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
पदाधिकाऱ्यांसह माहिती देताना राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील निकाल लक्षात घेता, आम्ही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. राज्यातील प्रत्येक ठिकाणी संघटनेची ताकद कशाप्रकारे वाढेल, या दृष्टीने कार्यकर्त्यांना सूचना देखील करण्यात आल्या आहेत. आम्ही 49 जागा लढवणार आहोत. मात्र शिवसेना आणि भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांना चर्चेसाठी आमची दारे खुली आहेत. आपण विधानसभा निवडणूक लढवणार नसलो, तरी माझ्याशिवायही इतर सक्षम उमेदवार संघटनेकडे आहेत, असे सांगत पक्षाच्या आगामी वाटचाली बाबत त्यांनी भाष्य केले.
निवडणुकीबाबत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन जाहीर भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान या कार्यकारणी बैठकीत शेतकऱ्याच्या प्रश्नावर उहापोह करण्यात आला. दुष्काळाने महाराष्ट्र होरपळत आहे, तर दुसरीकडे पीकविम्याच्या बाबतीत अनेक घोटाळे झाल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या हाती काही आले नाही, मात्र पीकविमा कंपन्या मालामाल झाल्याचेही त्यांनी सांगितले. ही योजना विमा कंपन्याच्या फायद्यासाठी आहे का, याचे उत्तर सरकारने द्यावे असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, कृषीपंपाचे वीजबिल माफ करावे, यासह विविध ठराव या बैठकीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.