Theatres in Pune : पुणे तेथे नाट्यगृह उणे... 'ईटीव्ही भारत' चा स्पेशल रिपोर्ट - पुण्यातील नाट्यगृह
कोरोनामुळे आधीच दीड वर्षे बंद असलेली नाट्यगृह (Theatres in Pune ) सुरु झाले. मात्र, अनेक अडचणी जाणवायला सुरूवात झाली आहे. कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहांतील AC तर दोन महिन्यांपासून बंद असल्याने चक्क दरवाजे उघडे ठेवून नाटकाचे प्रयोग करावे लागत आहेत.
![Theatres in Pune : पुणे तेथे नाट्यगृह उणे... 'ईटीव्ही भारत' चा स्पेशल रिपोर्ट pune theatres](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14549106-thumbnail-3x2-poo.jpg)
pune theatres
पुणे -पुणे हे शिक्षणाचं माहेरघर तसेच कला आणि संस्कृतीची साक्ष देत उभ असलेलं एक ऐतिहासिक शहर. पुण्यात नाटकांची देखील मोठी परंपरा आहे. अनेक नाट्यकर्मी या पुण्यात जन्मले, जगले आणि त्यांनी रंगमंच देखील गाजवला. पुण्याला बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण अशा सारख्या उत्कृष्ट नाट्यगृहांची परंपरा लाभली आहे. मात्र, आता पुणे शहराचे वैभव असलेल्या नाट्यगृहांची दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे.
पुण्यात नाट्यगृहांची दुरावस्था
पुण्यातील प्रमुख तीन नाट्यगृहांची दुरवस्था
पुण्यात मुख्य तीन नाट्यगृह आहेत. बालगंधर्व रंगमंदिर, कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह तर तिसरं मुख्य नाट्यगृह म्हणजे,अण्णाभाऊ साठे सभागृह. पण आता या तिन्ही नाट्यगृहात काही ना काही बिघाड झालेला दिसत आहे. बालगंधर्व रंगमदिराच कँटीन बंद आहे तर दुसरीकडे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामधील AC बंद आहे. तर अण्णाभाऊ साठे सभागृहात साऊंड सिस्टीमच नाही.
महापालिका प्रशसनाकडून कबुली
तर दुसरीकडे नाट्यगृहांची दुरावस्था झाल्याचं महापालिकेने ही मान्य केले आहे. मात्र, कोरोनामुळे पैसे कमी आणि कर्मचारी वर्ग नसल्याचे कारण देत ही दुरवस्था झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील एसी चालू करण्यासाठी अवघे 30 लाख रुपये लागत आहेत. तरीही महापालिकेने याकडे दुर्लक्ष का केलं असा प्रश्न उपस्थित होत आहे.