पुणे - राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. पुणे शहराचे तापमान 37 अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. एकीकडे उन्हाच्या या चटक्यापासून पुणेकर हैराण असताना, दुसरीकडे मात्र पुण्याच्या कात्रज प्राणी संग्रहालयातील हत्तीणी मीरा आणि जानकी या कडाक्याच्या उन्हात मनसोक्त पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत आहेत. गेल्या वर्षी महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या स्विमिंगपूलमध्ये ही जोडी दिवसातून 3 वेळा आंघोळ करत आहे.
कात्रज येथील प्राणीसंग्रहालयात गेल्या 18 वर्षांपासून मीरा आणि जानवीची ही जोडी वास्तव्याला आहे. त्यांच्यासाठी खंदक देखील खांदण्यात आले आहे. यापूर्वी या दोन्ही हत्तीणींना साखळीने बांधून आंघोळ घातली जात होती. मात्र त्यांना नैसर्गिक अधिवासाप्रमाणे आंघोळ करता यावी, म्हणून महापालिकेच्या वतीने याठिकाणी स्विमिंगपूल बांधण्यात आला आहे. या स्विमिंगपूलमध्ये मनसोक्त डुंबण्याचा आनंद मीरा आणि जानकी घेत आहेत.