पुणे -बहिण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन गुरुवारी ( ता. ११ ) साजरा होणार आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले. रक्षाबंधनही निर्बंधात साजरे करावी लागली. पण यंदा निर्बंध मुक्त झाले असल्याने आणि रक्षाबंधन 10 दिवसांवर येऊन ठेपले असल्याने पुण्यातील बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. बाजारात विविध प्रकारच्या राख्या दाखल असून लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत विविध राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. सध्या पुणे शहरात एका राखीची जोरदार चर्चा आहे. ती म्हणजे पर्यावरण पूरक राखी. पुण्यातील इको कडेल या कंपनीद्वारे आणि आयफेलो फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आणि सध्याची पर्यावरण परिस्थिती पाहता पर्यावरण पूरक राखी बनविण्यात आली आहे. ही राखी साधीसुधी नसून ही राखी बांधून झाल्यानंतर या राखीपासून नवीन रोप लावता येणार आहे.
...म्हणून बनविण्यात आली आहे पर्यावरण पूरक राखी :रक्षाबंधनच्या काळामध्ये अनेकदा प्लास्टिकच्या किंवा पर्यावरणाला घातक, अशा राख्या बाजारामध्ये उपलब्ध असतात. या राख्या दिसायला आकर्षक असतात मात्र या राखांच्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी होते. रक्ताच्या नात्या बरोबर पर्यावरणाचा नात देखील जपण्यासाठी आणि याच गोष्टीकडे लक्ष देऊन आम्ही पर्यावरण पूरक सीड राखीची संकल्पना मनात ठेवून बाजारामध्ये सीड राखी उपलब्ध करून दिली आहे. तसेच या राखीचे वैशिष्ट्य असे आहे की ही राखी पूर्णपणे वापरून झाल्यावर यात माती टाकून रोपे उगवू शकतात. ही राखी पूर्णपणे हातापासून बनविण्यात आली आहे. यात दोन्ही बाजूला विविध पालेभाज्यांची बिया लावण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी इको कडेल या कंपनीचे मयूर कुऱ्हाडे यांनी दिली.