इंजिनिअर तरूणीच्या हातातील मोबाईल हिसकावून पळणाऱ्याला अटक - पुण्यात मोबाईल चोर अटकेत
काम संपवून घरी जाण्यासाठी मोटारीची वाट पाहत मोबाईलवर बोलताना इंजिनिअर तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकाविणाऱ्या चोरट्याला स्थानिक नागरिकांनी पकडून येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
पुणे - काम संपवून घरी जाण्यासाठी मोटारीची वाट पाहत मोबाईलवर बोलताना इंजिनिअर तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकाविणाऱ्या चोरट्याला स्थानिक नागरिकांनी पकडून येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील आयबीएम कंपनीसमोर घडली. याप्रकरणी २० वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. राम आहुजी केदार (वय २३, रा. भैरवनगर, विश्रांतवाडी ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आयबीएम कंपनीत कामाला आहे. गुरुवारी काम संपवून तरुणी कॅबची वाट पाहत कंपनीच्या गेटजवळ उभी होती. त्यावेळी रस्त्याने पायी चालत आलेल्या रामने तरुणीच्या हातावर फटका मारून मोबाईल घेतला. त्यामुळे तरूणीने आरडा-ओरड केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आणि कंपनीतील कामगारांनी पाठलाग करून रामला पकडून पोलिसांच्या दिले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले तपास करीत आहेत.