पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील राहटणी येथे सराफी पेढीच्या दुकानावर दरोडा टाकण्यात आला होता. या सराईत गुन्हेगाराचा उत्तर प्रदेशातील पोलिसांनी एन्काऊंटर केल्याचे समोर आले आहे.
रवींद्र उर्फ कालिया गोस्वामी (वय-२८ रा.आदमपूर हिस्सार) असे एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपी गुन्हेगाराने साथीदारांसह पिंपरी चिंचवडमधील राहाटणी येथे दरोडा टाकला होता. त्यात तब्बल ९० लाख रुपयांचे ३ किलो सोन्याचे दागिने लंपास केले होते. दरोडा टाकणाऱ्या पैकी तो मुख्य सूत्रधार होता. त्यामुळे वाकड पोलीस त्याच्या शोधात होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात बंदूकधारी सहा जणांच्या टोळक्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पुणेकर ज्वेलर्स या सराफी पेढीवर दरोडा टाकला होता. यात मालक दिव्यांक मेहता यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. त्यात जखमी देखील झाले होते. त्यानंतर दुकानातील तीन किलो सोन्याचे दागिने आणि सीसीटीव्ही डिव्हीआर घेऊन पोबारा केला होता.
घटनेनंतर वाकड पोलीस परराज्यात जाऊन आरोपीचा शोध घेत होते. परंतु पोलिसांना तो गवसला नाही. मात्र, मंगळवारी हा 'वॉन्टेड' रवींद्र गोस्वामीचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर केला. हा एन्काऊंटर मेरठ येथील दौराला येथील सरधान रोडवर पोलीस चकमकीत करण्यात आला असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली.