पुणे- शहरातील रहदारी आणि वाहनांच्या प्रदूषणाचा प्रश्न ही मोठी डोकेदुखी आहे. यावर उपाय काढण्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरू असतात. पुणे महापालिकेने शहारातील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आता 'इलेक्ट्रिक बाइक ऑन रेंट'ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेत नागरिकांना शहरात फिरण्यासाठी विद्यूत दुचाकी भाड्याने मिळणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. शिवाय नागरिक आपली वाहने रस्त्यावर आणणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.
पुणे शहरामध्ये वाढते प्रदूषण व वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व्हिट्रो मोटर्स प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून हरित पुणेसाठी 'इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट' राबवला जाणार आहे. या प्रकल्पाला शहर सुधारणा समितीने शुक्रवारी (दि. 26 जून) मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली.
माहिती देताना नगरसेवक अमोल बालवडकर या दुचाकीने प्रवास करण्यास कमीत कमी 90 पैसे प्रती किलोमीटर ते जास्तीत जास्त 4 रुपये प्रती किलोमिटरचा खर्च पुणेकरांना येणार आहे. प्रकल्प राबविण्यासाठी एका ठिकाणी 10 दुचाकी चार्ज होतील, असे मुख्य रस्त्यावर एक चार्जींग स्टेशन ही उभारण्यात येणार आहे.
पुणे शहराच्या विविध भागामध्ये मुख्य रस्त्यांवर 500 ठिकाणी अशा प्रकारचे चार्जिंग स्टेशन उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे भविष्यात पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार असून एकूणच शहरातील वाहतूक कोंडी, प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पासाठी पुणे महापालिका कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणार नाही. तसेच प्रकल्प यशस्वी करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी व पुणे मेट्रोचे सहकार्य मिळणार आहे.
हेही वाचा -पडदा लवकर उघडू दे, बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त नटराजाला साकडे