पुणे : ईडीसारख्या ( ED ) कारवाया भाजप ( BJP ) करायला लावत नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर ( Rajiv Chandrashekhar ) यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत वक्तव्य केले. नॅशनल हेराल्ड ( National Herald ) प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांना पुन्हा समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यावर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना चंद्रशेखर यांनी उत्तर दिले.
आमची कोणाशी दुश्मनी नाही - काँग्रेस व अन्य पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाया भाजप करायला लावत आहे, असे विरोधी पक्षांचे नेते म्हणत आहेत. त्यावर चंद्रशेखर म्हणाले की, आमची कोणाशी दुश्मनी नाही. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आज पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. चंद्रशेखर म्हणाले, काँग्रेस सरकारने देशाची अर्थव्यवस्था बिघडवली. भाजपमुळे देशाची आर्थिक प्रगती वेगाने होत आहे. मोदी सरकारने युवकांसाठी किती रोजगार उपलब्ध करून दिला, असा सवाल पाच वर्षांपासून सामान्य नागरिक व विरोधी पक्षाचे नेते करत आहेत. त्यावर राजीव चंद्रशेखर म्हणाले, सरकारने युवकांसाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.