पुणे -युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू ( Russia Ukraine War ) आहे. तर गेल्या एक ते दिड महिन्यांपासून तिथे युद्धजन्य परिस्थितीती होती. या युद्धाचा परिणाम आता भारतावरही होऊ लागला. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सुर्यफूल तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. युक्रेनमधून वर्षाला 30 लाख टन सूर्यफूल तेल हे भारतात आयात केले जाते. सुर्यफूल तेलाची आयात ही रशिया आणि युक्रेनमधून होत असल्याने यात 80 टक्के युक्रेनमधून तर 20 टक्के रशियामधून सूर्यफूल तेल भारतात आयात केला जातो. पण, सध्या तिथे युद्ध सुरू असल्याने तेलाची आयात बंद झाल्याने तेलाच्या किंमतीत एका डब्यामागे तब्बल 300 ते 400 रुपये एवढी वाढ झाली ( Edible Oil Price Hike ) आहे.
युद्ध थांबलं तरी भाववाढ ही दोन ते तीन महिने असेल -रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या एक ते दीड महिन्यांपासून युद्धजन्य परिस्थितीती होती. त्यामुळे तेथून गेल्या एक ते दीड महिन्यांपासून कोणताही माल हा आयात झालेला नाही. ही मोठी गॅप पडणार आहे. जर आज तेथे शांतता जरी झाली असली तरी युक्रेनमध्ये जो मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हे सर्व काही पूर्ववत होण्यासाठी जवळपास दोन ते तीन महिने लागतील आणि अशीच खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ होईल, असे देखील यावेळी व्यापारी कन्हैयालाल गुजराथी म्हणाले.
कोणकोणत्या देशातून किती आयात होते -खाद्यतेलाच्या किंमतीत गेल्या दिड महिन्यांपासून सतत वाढ होत आहे. आपल्याकडे खाद्यतेलाची खपत ही 230 ते 240 लाख टनाची आहे. त्यातील आपल्याकडे उत्पन्न हे 70 ते 80 लाख टन आहे. आपण 150 लाख टन हे एम्पोर्ट करतो. यात प्रामुख्याने मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील, अर्जेंटिना, युक्रेन आणि रशिया या देशातून आपल्या देशात खाद्यतेल आयात केले जाते. ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांमधून आपल्या देशात सोयाबीनची आयात करण्यात येते. इंडोनेशिया आणि मलेशिया येथून पाम तेलाची आयात केली जाते. सुर्यफुलाची आयात ही रशिया आणि युक्रेनमधून होते. त्यात युक्रेन हा जगातील एकमेव देश असा आहे जो जगात 70 टक्के तेलाचे पुरवठा करतो, अशी माहिती व्यापारी कन्हैयालाल गुजराथी यांनी यावेळी दिली.