पुणे- मराठा आरक्षणाबाबत काही काही जण भावनेच्या अहेरी जाऊन काहीही बोलत असतात. मात्र, आरक्षण देण्याच्या प्रक्रियेसाठी संविधान आहे, कायदा आहे. म्हणून प्रत्येकाचा आवाका किती आहे, हे सर्वांना माहित आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थिगिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही वेगळा प्रयत्न करण्याचे काम करतोय. मराठा आरक्षणावरून काही लोक समजाला भडकवण्याचे काम करत आहेत. मात्र, आम्ही मराठा समजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे मत व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
मराठा आरक्षण प्रश्नी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले, ज्या प्रमाणे नरेंद्र मोदी सरकारने 10 टक्के आरक्षण दिल आहे आणि ते कोर्टातही टिकले आहे. तशाच पद्धतीचे काही प्रयत्न आम्ही देखील करतोय आणि त्याबाबत समितीदेखील नेमली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही जण काहीही म्हणत आहेत. मात्र राजकारणाच्या जागी राजकारण करावे, समजाला वेठीस धरू नये, आज सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला स्थिगती दिली त्याला आम्ही जबाबदार आणि जर ते आरक्षण मिळाले असते तर ते आमच्यामुळेच मिळाले, अशी विरोधकांची भूमिका आहे. मात्र अशा गोष्टींचा खूप राग असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.
आज ३४८वा शिवराज्याभिषेक दिन आहे. त्या निमित्ताने पुणे प्रशासानाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषद येथे घनकचरा, गाव स्वच्छता, नाले सफाई. एक कुटुंब एक शोषखड्डा मोहिमेचा प्रारंभही पवार यांच्या हस्ते करण्यात आला. 2016 ला पहिल्यांदा जिल्हा परिषदेत ठराव आला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात आज शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येत आहे. राज्यातील शाळा,महाविद्यालय,ग्रामपंचायत,जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका येथे शिवस्वराज्य दिन साजरा होत आहे.
ज्यांना काम नाही ते काहीही बोलतात-
अजित पवार यांच्याबरोबर सत्तास्थापनेसाठी जो शपथविधी पार पडला, त्यामुळे माझी प्रतिमा खराब झाली असल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. जी गोष्ट झाली त्याला सोडा, आत्ता कोरोनाचा काळ आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. विरोधकांना काही उद्योग नाही म्हणून ते काहीही उकरत बसत आहेत. ज्यांना काम नाही ते नको त्या गोष्टी बोलत असतात, असा टोला त्यांनी यावेळी फडणवीसांना लगावला.
पेट्रोल - डिझेल बाबत केंद्राने सूट द्यावी
देशभरात इंधनाच्या दरात दिवसंदिवस मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोल डिझेल बाबत केंद्र किंव राज्य काही सूट देणार आहे का याबाबत अजित पवार यांना विचारल्यावर कोरोनाची परिस्थिती पाहता पेट्रोल, डिझेल बाबत राज्य सरकार काहीही सूट देऊ शकत नाही. त्यामुळे केंद्रानेच त्याबाबत मदत करून पेट्रोल-डिझेल बाबत सूट द्यावी. केंद्राने यासाठी विचार करायला हवा. आम्ही विरोधात आहो म्हणून ही मागणी करत नाही तर सगळ्या गोष्टींचा विचार करून सांगत असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
दोनच वार्ड असावेत-
राज्यात पुढील वर्षी महापालिका निवडणूक होत आहेत. एकूणच प्रभाग रचना कशी असणार आहे, याबाबत पवार यांना विचारले असता, आजच्या घडीला दोनच वार्ड असावे हीच माझी भूमिका आहे. आघाडीमध्ये प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील आघाडीचा निर्णय शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे हेच घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गर्दी वाढली तर हा निर्णय घ्यावा लागेल
पुण्यात मिशन बिगन अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आले असून सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी गर्दी होत आहे. जर गर्दी वाढली तर एका बाजूची दुकाने एक दिवस सुरू आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या ठिकाणची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. हे निर्णय मनाला पटत नसले तरी परिस्थितीनुरूप असे पाऊल उचलावे लागेल असे सुतोवाच अजित पवार यांनी यावेळी केले.