पुणे - कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर पुण्यातील आरोग्यव्यवस्था किती ढासळली याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. एका 34 वर्षीय तरुणाला ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी चक्क आंदोलन करण्याची वेळ आली. सकाळी 11 पासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत या रुग्णाने वेगवेगळी सात रुग्णालये पालथी घातली. परंतु त्याला ऑक्सीजन बेड मिळालाच नाही. यानंतर संतापलेल्या या रुग्णाच्या कुटुंबीयांनी पुण्यातील मध्यवस्तीत असणाऱ्या अलका चौकात या रुग्णासह आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने धावाधाव करत या रुग्णासाठी बेडची व्यवस्था केली.
प्रहार संघटनेचे कार्यकर्ते असलेल्या सागर कुंभार यांनी या सर्व प्रकाराविषयी माहिती देताना सांगितले की, धायरी येथील या रुग्णाला न्यूमोनिया असल्यामुळे आज सकाळी 11 वाजता कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयात आणले होते. इथे त्याची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्याला घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले. परंतु कुटुंबीयांनी त्याला बरे वाटत नसल्यामुळे अडमिट करून घेण्याची विनंती केली. याउलट सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाने बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत ऍडमिट करून घेण्यास नकार दिला, असे सागर कुंभार यांनी सांगितले.
हेही वाचा -राज्यात आज आठ हजार नव्या रुग्णांसह २४६ मृत्यूंची नोंद; तर सात हजार रुग्णांना डिस्चार्ज..