पुणे - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे प्रमाण अधिक तीव्र प्रमाणात पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. फेब्रुवारीच्या सुमारास दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. एप्रिलच्या शेवटपर्यंत दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत गेली. मात्र, त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख सपाटीकरणावर असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाची दुसरी लाट सपाटीकरणावर, पुढे वाढू ही शकते किंवा ओसरूही शकते - डॉ.अविनाश भोंडवे इथून पूढे रुग्ण संख्या कमी होऊ शकते नाहीतर वाढूही शकते -
राज्यात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख हा सपाटीकरणावर आहे. जर राज्यातील लॉकडाऊन आहे असाच ठेवल तर रुग्णसंख्या ही कमी कमी होऊ शकते. मात्र, जर लॉकडाऊन काढला आणि पुन्हा पहिल्या सारखी गर्दी होऊ लागली तर कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते असे मत यावेळी डॉ.भोंडवे यांनी व्यक्त केले.
तिसरी लाट येणार, या लोकांना तिसऱ्या लाटेत अधिक धोका -
कोणतीही जागतिक साथ आली की त्या साथीच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट ही येतच असते. हाराष्ट्रात तयार झालेल्या डबल विषाणूने दुसऱ्या लाटेत आपल्याला याचा अधिक प्रभाव जाणवला. जर अश्याच पद्धतीने तिसऱ्या लाटेतही आपल्या इथेच कोरोनाच नवीन विषाणू किंवा परिवर्तित विषाणू तयार झाले, तर तिसऱ्या लाटेचाही प्रभाव अधिक असणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ज्यांना कोरोनाची लागण झाली नाही, त्यांना तिसऱ्या लाटेत कोरोनाच लागण होण्याची भीती जास्त आहे. ज्यांना पहिल्या लाटेत कोरोना होऊन गेला आहे, अश्या लोकांनाही तिसऱ्या लाटेत कोरोना पुन्हा होण्याची जास्त भीती आहे.
पर्याय एकच जास्तीत जास्त लसीकरण -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आणि तिसऱ्या लाटेवर नियंत्रण आणायचे असेल तर राज्यात येत्या दोन महिन्यात जास्तीत जास्त लसीकरण करायला हवे. सध्या कोरोनाला रोखण्यात लसीकरण हाच एकमेव उपाय आहे, असे डॉ.भोंडवे म्हणाले.