पुणे -आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरू नका, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे, पुण्यातल्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. दरम्यान यावेळी सेंट्रल सॉफीस्टीकेटेड ऍनालेटिकल इन्स्टुमेंटेशन फॅसिलिटी आणि प्रिन्सिपल व्हर्च्युअल केबीनचे डिजिटल स्वरुपात अनावरण व सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, आपण सर्वजण आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहोत. परंतु, केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी झटणे आवश्यक आहे. सदाचार ही जीवनातील महत्त्वपूर्ण बाब आहे. सदाचारी व्यक्तीचा सदैव गौरव केला जातो, यासाठी सदाचारी बना. परकीय देशांच्या भाषेचे ज्ञान घेताना मातृभाषेकडे दुर्लक्ष करु नका. आपल्या मातृभूमीचा व मातृभाषेचा सदैव अभिमान बाळगा, असे त्यांनी यावेळी सांगितले.