पुणे- पिंपरी-चिंचवडमधील नामांकित रुग्णालयाच्या डॉक्टरची 8 कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत अज्ञात व्यक्तीने 40 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
8 कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवत डॉक्टरची 40 लाखांची आर्थिक फसवणूक
स्टॅण्डर्ड चार्टड बँक कल्याणीनगरच्या पुणे शाखेचे 8 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत डॉक्टरकडून 40 लाख रुपये घेत फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. डॉ. वाघ यांनी निगडी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. अमित अनंत वाघ असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव असून रोहन पवार नावाच्या व्यक्तीविरोधात त्यांनी निगडी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर हे करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी परिसरातील एका नामांकित रुग्णालयाचे डॉ. अमित वाघ हे संचालक असून त्यांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक मशीन आणायच्या होत्या. त्यासाठी त्यांना कर्ज हवे होते. दरम्यान, डॉक्टर यांच्या फोनवर आरोपी रोहन याने फोन करुन मी स्टॅण्डर्ड चार्टड बँक कल्याणीनगर, शाखा पुणे येथून बोलत आहे. डॉक्टरांसाठी लोनची स्कीम आहे. तर, तुम्हाला कर्जाची गरज आहे का? असे विचारत कर्जाबद्दलची सर्व माहिती देत वाघ यांचा विश्वास संपादन केला.
वाघ यांच्याकडून केवायसी कागदपत्रे घेऊन त्यांना 8 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे पवार याने सांगितले. 8 कोटींचे स्टॅण्डर्ड चार्टड बँक कल्याणीनगर, शाखा पुणेचे खोटे बनावट मंजुरी पत्र तयार करून दिले. यानंतर डॉक्टरकडून रोख रक्कम 40 लाख रुपये घेत आर्थिक फसवणूक केली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर यांनी दिली आहे.