पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधे पडलेली फुट अधिकच मोठी होताना दिसत आहे. नुकतंच अंनिसचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एन डी पाटील यांच्या निधनानंतर कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने सरोजताई पाटील यांची निवड करण्यात आली आहे. आत्ता या निवडीवरून पुन्हा एकदा अंनिसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. संघटनेच्यावतीने कोणतीही अशी निवड करण्यात आलेली नाही. संघटनेची निवड 3 वर्षाच्या कालावधीनंतर जून 2022 मध्ये करण्यात येईल, असे अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर दोन गटातील वाद पुन्हा उफाळला -
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबीयांच्या समितीत सक्रिय होण्यास आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट डॉक्टर हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांच्या सोबत काम करतोय तर दुसरा गट अविनाश पाटील यांच्या सोबत काम करतोय. नुकतेच एन डी पाटील यांचे निधन झाल्यावर या दोन गटातील वाद पुन्हा उफाळून आला आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद आणि मुलगी मुक्ता दाभोळकर यांनी संघटनेचा सात कोटी रुपयांचा निधी असलेला ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा गंभीर आरोप केला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर दाभोळकर यांनी ट्रस्ट ताब्यात घेतला आहे. हमीद- मुक्ता दाभोलकर स्थापित गटाने एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांची अध्यक्षपदी निवड केली आहे, असा आरोप यावेळी अविनाश पाटील यांनी केला आहे.
अविनाश पाटील यांनी पत्रात काय म्हटलंय -
अविनाश पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे की, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी व्यापक प्रयत्न आणि संघटनांची गरज आहे. असे संघटनात्मक काम हमीद- मुक्ता गटाने नक्की करावे, त्यासाठी नवीन संघटना स्थापन करावी, पण आधीपासुन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव वापरून समांतर कार्यपद्धती अवलंबून नये. प्रत्यक्षात स्वतः काहीही काम न करता, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करुन, संघटीत कार्यकर्त्यांच्या कामाचे श्रेय घेऊ नये. संघटना म्हणुन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते समर्पित भावनेने काम करीत आहेत. खरे तर समाज परिवर्तनाच्या चळवळीत कार्यकर्त्यांना देण्यासारखे फार काही नसते, त्यातल्या योगदानाचे श्रेय हेच एकमेव असते.
अविनाश पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे की, वारसा हक्क आणि घराणेशाहीने एकूणच पुरोगामी चळवळीचे अतोनात नुकसान झाले आहे. संत, समाज सुधारकांची जाज्वल्य परंपरा असलेला महाराष्ट्र फुले- शाहु- आंबेडकरांचा विचार वारसा घेऊन आपला हिरक महोत्सव साजरा करीत आहे. अशा पुरोगामी महाराष्ट्राच्या 60 वर्षातील सर्वांगिण विकासाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या परिवर्तनशील चळवळींनी आपल्या मर्यादा ओलांडण्याचा देखील विचार करायला हवा.