पुणे - एका रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनावरून दोन नगरसेवकांमध्ये (Corporators Clashes) रस्त्यावरच वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पुण्यातील कात्रज परिसरातील प्रभाग क्र ३८ अंतर्गत उत्कर्ष सोसायटीच्या (Utkarsh Society Katraj) ३० फूट मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनावरून स्थानिक नगरसेवकांमध्ये वाद झाला. उत्कर्ष सोसायटी येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश कदम (Prakash Kadam) व भाजप नगरसेविका मनिषा कदम (Manisha Kadam) यांच्यात हा वाद झाला.
पुण्यात दोन नगरसेवकांमध्ये रस्त्यातच वाद या दोघांमध्ये थेट रस्त्यावरच वादविवाद सुरू होता. बराच वेळ चाललेला हा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नसताना अखेर स्थानिक नागरिकांनी दोघांनी भूमिपूजन करा पण वाद करू नका, असे सांगितले. आणि दोघेही नगरसेवक शांत झाले.
कात्रज येथील उत्कर्ष सोसायटी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश कदम व भाजप नगरसेविका मनिषा कदम हे दोघेही रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी निधी आपणच मंजूर केला असा दावा करत होते. मात्र, हा निधी नेमका आणला कोणी याबाबत स्थानिक नागरिकही संभ्रमात पडले आहेत. बराचवेळ चाललेला हा श्रेयवाद संपत नसल्यामुळे शेवटी तिथल्या स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेत दोन्ही नगरसेवकांना भूमिपूजन करा पण वाद करू नका, असे सांगितले. त्यानंतर अखेर हा वाद मिटला.
- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूमिपूजनाचा सपाटा -
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता नगरसेवकांनी आपापल्या वार्डात विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. अशातच याच श्रेयवादाच्या लढाईमुळे स्थानिक नगरसेवकांमध्ये अनेकदा वाद होताना दिसत आहेत.