पुणे- गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यामुळे अनेक गरीब विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडत असल्याचे चित्र सगळीकडेच बघायला मिळते. मात्र, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुण्यातील काही नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी संस्थेच्या माध्यमातून तब्बल साडेतीन हजार विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठबळ दिले आहे.
आम्ही फक्त दोन हातातील अंतर कमी करतो म्हणत 'दिशा'ने दिले हजारो विद्यार्थ्यांना पाठबळ
संस्थेने गेल्या 10 वर्षांमध्ये साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार पूरक आणि पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीच्या स्वरूपात मदत उपलब्ध करून दिली आहे.
सन 2007 साली सुरू झालेल्या या उपक्रमाचे रुपांतर कालांतराने दिशा परिवार नावाच्या एका धर्मदाय संस्थेमध्ये झाले. या संस्थेचे संस्थापक सदस्य असलेले अरुण कुलकर्णी सांगतात, की राजाभाऊ चव्हाण आणि त्यांच्या मित्रांनी 2007 मध्ये गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी दिशा परिवार या संस्थेची स्थापना केली होती. संस्थेने गेल्या 10 वर्षांमध्ये साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार पूरक आणि पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीच्या स्वरूपात मदत उपलब्ध करून दिली आहे. त्याप्रमाणेच संस्थेने नुकतेच पुण्यातील वाघोली येथे राज्याच्या ग्रामीण भागातून पुण्यामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या गरजू विद्यार्थिनींसाठी वसतीगृह देखील बांधले आहे. तसेच भविष्यात मुलांसाठी देखील अशा प्रकारचे वसतिगृह बांधण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
दरम्यान, संस्थेच्या वतीने दरवर्षी मराठवाड्यातील 100 हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. त्याप्रमाणेच त्यांना कौशल विकास आणि व्यवस्थापन शास्त्राचे ही शिक्षण प्रदान केले जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर रोजगार मिळण्यास मदत होते, असेही कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.