बारामती - महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्द गाजत आहे. यातच यशवंत प्रहार सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ शशिकांत तरंगे यांनी अन्य धनगर बांधवांसह इंदापूर तालुक्यातील रूई येथे बुवा देवाला दुग्धाभिषेक घातला. यावेळी धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांना सद्बुद्धी देण्याची मागणी केली.
धनगर नेते शशिकांत तरंगेंनी भविष्यात सरकार विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा दिला इशारा धनगर समाजाला राजकीय पक्ष वापरून घेत आहेत -
यावेळी बोलताना शशिकांत तरंगे म्हणाले की, चालु अर्थसंकल्पामध्ये धनगर समाजाच्या उन्नतीसाठी १ हजार कोटी रुपये व २२ योजनांची तरतूद राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी करावी. धनगर समाजाला राजकीय पक्ष वापरून घेत आहेत. राजकीय पक्षांनी धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न्याय प्रविष्ठ केला आहे. शुक्रवारी एका स्मारकासाठी ४०० कोटी दिले आहेत, आम्ही जिवंत माणसांना १ हजार कोटी रुपये मागतो आहोत. आमचा समाज हा वंचित असून भरडला जात आहे. त्यामुळे आंदोलन केले पाहिजेत, आपल्यावर होणारा अन्याय त्यांच्यापर्यंत पोहचला पाहिजे.
आमच्या बाबतीत वेगळा न्याय -
यापुढे बोलताना डॉ.तरंगे म्हणाले की, धनगर आरक्षणासाठी यापूर्वी औरंगाबाद व पैठण येथील युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठा समाजातील युवकांनी ही आरक्षणासाठी आत्महत्या केली तेव्हा त्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी दिली, आर्थिक मदत केली. मात्र, आमच्या बाबतीत वेगळा न्याय दिला जातो, ही दुजाभावाची भावना बद्दलली पाहिजे. मागील वर्षीची १ हजार कोटीची तरतूद व चालू वर्षीचे १ हजार कोटी असे अनुशेष भरून २ हजार कोटींची तरतूद करण्यासाठी सरकारला सद्बुद्धी द्यावी. चालू अर्थसंकल्पात सरकारने तरतूद केली नाही तर धनगर व सरकार संघर्ष अटळ आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व समाज एकत्र करू असे त्यांनी यावेळी नमूद केले.