पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. या निर्णयाविरोधात पुण्यातील धनंजय कुलकर्णी यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावरून आता त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आहे. प्रथमेश पाटील आणि भगवान ठाणे या दोघांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून, या दोघांचा शोध सुरू आहे.
धमक्या देणं योग्य नाही - धनंजय कुलकर्णी
दहावीची परीक्षा होणार की नाही होणार हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे. यासंदर्भात मी जनहीत याचिका दाखल केली आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून मी याचिका दाखल केली आहे. न्यायालय योग्य निर्णय घेईलच, असा विश्वास आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून काही पालक आणि विद्यार्थी मला धमक्या देत आहेत. परंतु या प्रकरणात विद्यार्थ्यांचे हीत महत्त्वाचे आहे, कोणत्याही विद्यार्थ्याच्या जीवाला धोका होणार नाही, असं नियोजन करूनच परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे अशा धमक्या देणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.