पुणे - राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली सर्व मंदिरे आणि धार्मिक प्रार्थनास्थळे सोमवारपासून खुली करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाचे सर्वच स्थरातून स्वागत होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या पदाधिकारी आणि भाविकांनीही स्वागत केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेऊन आम्हाला दिलेली दिवाळी भेट दिली असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी दिल्या आहेत.
ही तर श्रींची इच्छा-
दिवाळी पाडव्यापासून म्हणजे सोमवार पासून राज्यातील मंदिरांसह सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. हा फक्त सरकारी आदेश नसून श्री ची इच्छा समजा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरू झाल्याने राज्यातील मंदिरही सुरू करावीत, अशी मागणी सातत्याने होत होती. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळ उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर दगडूशेठ हलवाई मंदिराच्या भाविकांनी या निर्णयाचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले आहे.