बारामती ( पुणे) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्ता स्थापनेसाठी व इतर कारणासाठी राज्यपालांना किती वेळा भेटले. अशी माहिती अधिकारातून मागवली असता राज्यपाल फडणवीस यांना भेटलेच नसल्याची माहिती देण्यात आली आहे. अशी खोटी माहिती देण्यात आल्याचा दावा बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केला आहे.
राजभवन येथील भेटीच्या रजिस्टरमध्ये भेटीचे कारण :यादव यांनी १९ जून ते १ जुलै २०२२ दरम्यान देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवन येथे ज्या ज्या तारखेस आले होते. ती तारीख तसेच राजभवन येथील भेटीच्या रजिस्टरमध्ये भेटीचे कारण व राज्यपालांना सादर केलेल्या कागदपत्रांची छायांकित प्रत मिळण्याची मागणी यादव यांनी केली होती. मात्र या काळात देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटण्यासाठी आल्याची नोंद आढळून येत नाही. अशी माहिती अधिकारातून यादव यांना देण्यात आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव
राजभवनावर भेट झाल्याच्या विविध बातम्या वृत्तपत्रामध्ये : वास्तविक पाहता २८ जुन २०२२ रोजी राज्यपाल व देवेंद्र फडणवीस यांची राजभवनावर भेट झाल्याच्या विविध बातम्या वृत्तपत्रामध्ये आहेत. असे असतानाही राज्यपाल भवन कार्यालयाने अशी भेट झाली नसल्याची माहिती दिली आहे. तसेच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होण्यापूर्वी कोणत्या पक्षांनी व व्यक्तींनी सत्ता स्थापनेसाठी विनंती केली होती. याची यादी नितीन यादव यांनी मागवली होती. मात्र यावर सदरची माहिती राज्यपालांकडेच असल्याची माहिती माहिती अधिकारातून देण्यात आली आहे.
पत्रे अद्यापपर्यंत राज्यपालांनी स्वतःकडेच ठेवली : सरकार स्थापन झालेले असताना सुद्धा कोणत्या पक्षाला राज्यपालांनी निमंत्रित केले किंवा त्यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांनी दिलेली पत्रे अद्याप पर्यंत राज्यपालांनी स्वतःकडेच ठेवली आहेत. नेमकी त्यांना कशाची भीती आहे की सदर कागदपत्रे सर्वसामान्यांना खुली करण्या ऐवजी स्वतःकडेच बाळगली आहेत, याचे आश्चर्य वाटते, असे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी सांगितले.