पुणे - अमित शाह हे राजकारणात येण्याआधी सहकारात होते. ते कार्यकर्ते म्हणून सहकारातून तयार झाले. त्यानंतर ते राजकारणात आले. त्यामुळे सहकार त्यांना पूर्णपणे माहीत आहे. गुजरात मधल्या सहकारातील प्रमुख नाव अमित शाह होते. त्यामुळे त्यांच्याकडे सहकार मंत्रालय देण्यात आले असावे. अमितभाईकडे काही गोष्टी गेल्यानंतर काही लोकांना कापरे भरते, त्याला आपण काही करू शकत नाही. असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केंद्रीय मंत्रालयाचा फायदा महाराष्ट्राला अधिक -
केंद्र सरकारने नव्याने निर्माण केलेल्या सहकार मंत्रालयाविषयी विचारणा केल्यानंतर ते म्हणाले, केंद्र सरकारने 70 वर्षात प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. त्यावर केंद्र का हस्तक्षेप करत आहे, असा प्रश्न विचारला जातोय. केंद्र सरकारने उभे केलेल्या सहकार मंत्रालयाचा फायदा संपूर्ण देशाला आणि विशेषत: महाराष्ट्राला होणार आहे. महाराष्ट्रातील साखर कारखानदारी जी मरणासन्न अवस्थेत होती ती मोदी सरकारच्या निर्णयामुळे पुनर्जिवीत झाली. त्यामुळे सहकाराला वाचवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे आणि आता स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रात चांगले बदल होतील, अशी अपेक्षा आम्हाला आहे.
अधिवेशन काळातच कोरोना अधिक गंभीर का होतो ?
फडणवीस म्हणाले, अधिवेशन आले की डेल्टा येतो, केलट येतो, अजून काय काय वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि अधिवेशन झाले की याच्या चर्चा संपतात. कोरोना गंभीर आहेच परंतु अधिवेशन आले की तो जास्त गंभीर का होतो. जनतेच्या प्रश्नांची सगळी आयुध गोठण्याचे काम सरकारने केले आहे. लोकशाहीला कुलूपबंद करण्याचे काम, लोकशाहीला फासावर चढवण्याचे काम आघाडी सरकारने केले आहे. त्यांच्याविरोधात संघर्ष केल्याने आमदारांना निलंबित केले आहे. तरीदेखील ओबीसी समाजाचे, मराठा समाजाचे प्रश्न आम्ही मांडतच राहू. ओबीसींच्या प्रश्नावर आमची लढाई सुरूच राहील. जोपर्यंत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ही लढाई आम्ही चालूच ठेवणार आहोत.