पुणे -अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, आरोप प्रत्यारोपमध्ये महाराष्ट्र पुढे जाणार नाही. ज्यांना काय म्हणायचं आहे ते त्यांना म्हणू द्या.आम्हाला आमचं काम भलं आम्ही भले. याबाबत पक्षाचे नेते शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. जे आज तारखा देत आहे. त्यांना तारख्या देऊ द्या. ज्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार आले आहे, तेव्हापासून विरोधीपक्षाच्या नेत्यांकडून तारखा दिल्या जात आहे. तोपर्यंत 145 ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी आहे. तसेच जो पर्यंत हे तिन्ही पक्ष एकत्र आहे. तोपर्यंत हे सरकार चालणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे यावेळी अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळजाई येथील वन उद्यानाचे उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले, प्रत्येकाने हे बघितलं आहे की कोणीतरी एखादा व्यक्ती पहाटे 3 वाजता ट्विट करतो आणि त्यानंतर 5 वाजता अधिकरी येत असतात. मंत्री नवाब मलिक यांचे प्रकरण हे 1993 चे आहे. आज 2022 आहे. न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून ते आपली भूमिका मांडत आहे. सरकार येतात आणि जातात पण द्वेषभावनेतून ज्याने त्याने कस वागावं हे त्याने ठरवावं, असे देखील यावेळी पवार म्हणाले.
मराठी भाषेतील बोर्ड लावण्यात काय हरकत
मराठी भाषेबाबत देखील सरकार प्रयत्नशील असून नुकतंच मराठी पाट्यांबाबत देखील निर्णय घेण्यात आला आहे. पण त्याहीविरोधात काहीजण कोर्टात गेले आणि त्यांना तिथं चपराक बसली. महाराष्ट्रात राहताय तर मराठी भाषेत बोर्ड लावण्यात काय हरकत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे, यासाठी आम्ही देखील प्रयत्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भाषा आहे. सर्वजण महाराजांच नाव घेतात. अभिजात दर्जा द्यायचं का हे केंद्राच्या हातात आहे, असं यावेळी पवार म्हणाले.