पुणे- काल एसटी कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरी चप्पल आणि दगड फेकण्यात आले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, की एसटी कर्मचारी असा विचार करणारे नाही. नको त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात घातली गेली. कोणतीतरी शक्ती त्यांच्या पाठीशी होती. ते शोधून काढण्याचे काम पोलिसांचे आहे. पोलीस तश्या पद्धतीने कामाला देखील लागले आहे. पोलीस प्रशासन यामागील मास्टर माईंड कोण आहे, याचा नक्कीच शोध घेतील असे यावेळी पवार म्हणाले. औंध येथे एका कार्यक्रमानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते यावेळी ते बोलत होते.
पोलिसांचे देखील अपयश - अजित पवार म्हणाले, मला एका गोष्टीची गम्मत वाटते की दोन दिवसांपूर्वी हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर गुलाल उधळत मिठाई वाटप करण्यात आली. ज्यांनी कोणी आंदोलन केले होतं, त्यांना खुप मोठं यश मिळालं आहे असं दाखवलं. मग एवढं सर्व होत असताना सिल्व्हर ओकवर जाण्याचे काहीही कारण नव्हते. मग आत्ता याचा काय अर्थ लावायचा. पण एक गोष्ट आहे की पोलीस प्रशासन माहिती मिळवण्यात कमी पडले. आंदोलनाची माहिती मिडियाला मिळते मात्र पोलिसांनी मिळत नाही. हे पोलिसांचे अपयश असल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली. याचीदेखील चौकशी सुरू असलयाचे पवार यांनी सांगितले.