पुणे - कोविड महामारीच्या प्रादुर्भावामुळे 2019-20 या वर्षात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली. मात्र, यावर्षी 2021मध्ये जनजीवन पूर्वपदावर आल्याने उत्पन्नात हळूहळू वाढ झाल्याचे मिळकत कर अधिकारी स्मिता झगडे यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले आहे. यावर्षी आत्तापर्यंत 385 कोटी मिळकत कर उत्पन्न महानगर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
सामान्य नागरिकांच्या आर्थिक उत्पन्नाला फटका
2020मध्ये फेब्रुवारी महिन्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झाला. याचा थेट फटका सर्व सामान्य नागरिकांच्या आर्थिक उत्पन्नावर झाला. ज्यामुळे महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात घट झाली. 2018-19च्या तुलनेत 2019-20 या वर्षांमध्ये 25 कोटी उत्पन्न कमी मिळाले आहे, अशी माहिती मिळकत कर अधिकारी स्मिता झगडे यांनी माहिती दिली आहे. कोरोना प्रादुर्भाव ओसरत असल्याने पालिकेच्या उत्पन्नात वाढ होत आहे.
विशेष सवलत
कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरातील जनजीवन, व्यवहार पूर्वपदावर आलेले असून राज्यशासनाने आणि महानगरपालिकेने नागरिकांना मिळकत कर भरत यावा यासाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यात, राज्यशासनाने अवैध बांधकाम शास्ती कर सोडून मूळ कर भरण्यास परवानगी दिली आहे. तर, महानगरपालिकेतर्फे अभय योजनेअंतर्गत जे थकबाकीदार आहेत त्यांना अवैध बांधकाम शास्तीकर वेगळा ठेवून मूळ कर एक रकमी भरण्यास मुभा देण्यात आली आहे. जुने आणि मोठे रकमेचे थकबाकीदार म्हणजे 25 लाखांपेक्षा अधिक असलेल्या व्यक्तींकडे तगादा लावत जप्तीची कारवाई केली जात आहे, अशी माहिती झगडे यांनी दिली. दरम्यान यावर्षी 385 कोटी मिळकत कर उत्पन्न महानगरपालिकेला मिळाले असून हे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.