पुणे - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यातून अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या नागरीकांना सूट देण्यात आलीय. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केट आणि भुसार बाजार सुरू होते. मात्र, संपूर्ण पुणे शहराला भाजीपाल्याचा पुरवठा करणारे मार्केटयार्ड बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. आता पोलीस हमाल आणि इतर कर्मचाऱ्यांची अडवणूक करत असल्यामुळे भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय पुणे व्यापारी संघटनेने घेतला आहे. त्यानुसार आजपासून सर्व भुसार बाजारातील सर्व व्यवहार आजपासून बंद ठेवण्यात आले आहेत.
याविषयी अधिक बोलताना पुणे मर्चंट चेंबर असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब ओसवाल म्हणाले, मार्केटमध्ये येणाऱ्या हमाल आणि इतर कर्मचाऱ्यांना पोलीस मध्येच अडवतात, त्याना मारहाण करतात आणि परत पाठवतात. त्यामुळे हमाल दुकानापर्यंत पोहचतच नाहीत. वास्तविक या कर्मचाऱ्यांना मार्केट कमिटी आणि जिल्हाधिकारी प्रशासनाकडून पास देण्यात आले आहेत. ते पास मान्य करून पोलिसांनी या कर्मचाऱ्यांची अडवणूक करू नये. जर पोलिसांकडून हमाल आणि कर्मचाऱ्यांची अडवणूक नाही झाली तर दुकाने भुसार बाजारातील दुकाने पूर्ववत सुरू राहतील.