पुणे- बीव्हिजी ग्रुपचे मालक हणमंतराव गायकवाड व पत्नी वैशाली गायकवाड यांची तब्बल १६ कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसात हणमंतराव गायकवाड यांनी तक्रार दाखल केली आहे.
बीव्हिजी ग्रुपच्या मालकांची तब्बल १६ कोटी रुपयांची फसवणूक; दाम्पत्यावर गुन्हा दाखल
वेगवेगळ्या कंपनीत समभाग गुंतवून ते परत मिळणार या आशेने गुंतवणूक करण्यात आली. मात्र ती रक्कम परत न मिळाल्याने पोलिसात फसवणूकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार बीव्हिजी ग्रुपचे मालक असून त्यांची तब्बल 16 कोटी 46 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
तक्रारदाराच्या तक्रारीनुसार आरोपी विनोद रामचंद्र जाधव व त्यांची पत्नी सुवर्णा विनोद जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या तीन कंपनीत गायकवाड दाम्पत्यांनी पैसे गुंतवले होते. आरोपींनी त्याचा परतावा अथवा समभाग न देता फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी तिन्ही कंपन्यांविषयी माहिती देण्यासाठी गायकवाड यांच्या चिंचवड येथील कार्यालयात जाऊन माहिती दिली. तसेच कंपन्या या नफ्यात असून औषध व्यापार करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या सर्व माहितीवर विश्वास ठेवून वैशाली गायकवाड यांनी तिन्ही कंपनीत १६ कोटी ४५ हजार रुपये गुंतवले. गुंतवणूक केल्यानंतर तिन्ही कंपनीत २६ टक्के समभाग देण्याचे आरोपी यांनी कबुल केले होते.
परंतु त्यांनी अद्यापही तसे न करता रक्कम परत केली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान हणमंतराव गायकवाड यांना एका कंपनीच्या संचालकपदी नियुक्त करण्यात आली होती. मात्र त्यांना कंपनीच्या आर्थिक व्यवहाराबाबत अलिप्त ठेवण्यात आले. म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे १६ कोटी ४५ लाख रुपयांची गुंतवणूक रकमेचा समभाग अथवा त्याचा परतावा व मूळ मुद्दल न देता फसवणूक केल्याने चिंचवड पोलिसात तक्रार दिली आहे.