पुणे - डायलिसिसच्या उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या एका तरुणाचा अचानक त्रास झाल्यामुळे पुणे अहमदनगर रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयात मृत्यू झाला. शनिवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मात्र, या तरुणाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृत तरुणाच्या भावाने केली. प्रदीप सखाराम खांदवे (वय 37) असे मृत रुग्णाचे नाव आहे.
डायलिसिसकरता आलेल्या रुग्णाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू मृत रुग्णाचे भाऊ संजय खांदवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप खांदवे हे गुरुवारी सकाळी डायलिसिसचा उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्यामुळे डायलिसिस थांबवण्यात आले. रुग्णाची अवस्था गंभीर असतानाही हॉस्पिटलने त्यांना बेड उपलब्ध केला नाही आणि व्हेंटिलेटर ही लावला नाही, असा आरोपही खांदवे यांनी केलाय. तसेच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर रुग्णाची अवस्था गंभीर आहे, हे माहीत असतानाही रुग्णालय सोडून बाहेर निघून गेल्याचा आरोपही त्यांनी केलाय. यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रदीप खांदवे यांची covid-19 ची टेस्ट करून ती पॉझिटिव्ह असल्याचे सांगत त्यांना रूग्णालयाच्या आयसीयूमध्ये भरती केले. दरम्यान, खांदवे यांच्या नातेवाईकांना रुग्णालयातील सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी दुसऱ्या खासगी डॉक्टर मार्फत रुग्णाची तपासणी करून देण्याची मागणी केली. परंतु सह्याद्री रुग्णालयाने याला नकार दिला. परंतु कुटुंबीयांनी ही मागणी लावून धरल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांना ही परवानगी देण्यात आली. प्रायव्हेट डॉक्टर रुग्णांची पाहणी करण्यासाठी गेले असताना त्यांना प्रदीप खांदवे हे मृत असल्याचे समजले. त्यानंतर प्रदीप खांदवे यांच्या कुटुंबीयांनी खाजगी रुग्णालय आणि ससून रुग्णालयात covid-19 ची चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली.सह्याद्री रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रदीप खांदवे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच नातेवाईकांना भेटता येऊ नये यासाठी त्यांना covid-19 ची बाधा झाल्याचे खोटे सांगण्यात आले. हलगर्जीपणा दाखवणाऱ्या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी प्रदीप खांदवे यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आंदोलनही केले. येरवडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी याप्रकरणी तक्रारही दिली आहे. या सर्व प्रकारावर सह्याद्री रुग्णालयाची बाजू जाणून घेण्यासाठी सह्याद्री रुग्णालयातही संपर्क साधला होता. परंतु त्यांच्याकडून अद्याप कुठलीही माहिती मिळाली नाही.