पुणे - ग्राहकाने उपवास सोडण्यासाठी बटर पनीर ऑर्डर केले, पण त्याला बटर चिकन पाठवले. हा धक्कादायक प्रकार नागपूरचे वकील षण्मुख देशमुख यांच्यासोबत घडला. या प्रकरणात पुणे जिल्हा ग्राहक न्यायालयाने झोमॅटो आणि हॉटेलला ५५ हजारांचा दंड ठोठावला आहे.
उपवासाला झोमॅटोतून मागवले पनीर, पाठवले चिकन; ग्राहक मंचानी ठोठावला ५५ हजारांचा दंड
ग्राहकाने उपवास सोडण्यासाठी बटर पनीर ऑर्डर केले, पण त्याला बटर चिकन पाठवले. त्यामुळे ग्राहकाने या संतापजनक प्रकारानंतर झोमॅटो आणि संबंधित हॉटेलविरोधात तक्रार केली. त्यानंतर ग्राहक मंचाने झोमॅटो आणि संबंधित हॉटेलला ५५ हजार रुपये दंड ठोठावला.
देशमुख हे ३१ मे २०१८ रोजी कामानिमित्त पुण्यात गेले होते. गुरुवारी त्यांचा उपवास असतो, रात्री उपवास सोडण्यासाठी त्यांनी बटर पनीरची ऑर्डर दिली. ते ज्या हॉटेलला थांबले होते, तिथेच जेवणाचे पार्सल आले. त्यांनी जेवणाला सुरुवात केली. तेव्हा त्यांना हे पनीर बटर मसाला नसून बटर चिकन असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा जेवणाची ऑर्डर केली. त्यावेळीही तोच निष्काळजीपणा दिसून आला. त्यामुळे या संतापजनक प्रकारानंतर त्यांनी झोमॅटो आणि संबंधित हॉटेलविरोधात तक्रार केली. तक्रारीवर कारवाई करत ग्राहक मंचाने झोमॅटो आणि संबंधित हॉटेलला ५५ हजार रुपये दंड ठोठावला आणि ४५ दिवसांत पैसे देण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्याच्या प्रीत पंजाबी स्वाद हॉटेलमधून जेवणाचे पार्सल देताना, त्यात झालेल्या चुकीचा मोठा मनस्ताप देशमुख यांना सहन करावा लागला. ते स्वतः वकील असल्यामुळे त्यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली. पण अशाच प्रकारे अनेक ग्राहकांना रोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनीही जागरुक होऊन ग्राहक मंचाकडे धाव घेण्याची गरज आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.