पुणे - शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेले विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना विशेष न्यायालयाने सहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश ए.एस.गोसावी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे. याप्रकरणी योगेश लकडे (वय-39) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनिल शिवाजीराव भोसले (वय-55), सूर्याजी पांडुरंग जाधव (वय-69), तानाजी दत्तु पडवळ (वय-50) आणि शैलेश संपतराव भोसले (वय-47) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. अनिल भोसले बँकेचे अध्यक्ष असताना सूर्याजी जाधव संचालक होते. तसेच पडवळ मुख्य कार्यकारी अधिकारी तर, शैलेश भोसले बँकेचे मुख्य हिशोब तपासणीस होते. रिझर्व्ह बँकेने फिर्यादीच्या कंपनीला बँकेच्या रोख शिल्लक रक्कमेबाबत पडताळणी करण्यासाठी सांगितले. यावेळी बँकेने 71 कोटी 78 लाख 87 हजार रूपये रोख असल्याचे कागदोपत्री दाखवले. तसेच ही रक्कम बँकेच्या मुख्य शाखेकडे पाठवल्याचे सांगण्यात आले होते.
आरोपींनी वयक्तिक फायद्यासाठी रक्कम वापरली
आरोपींनी पदाचा गैरवापर करून जवळपास 72 कोटींची रक्कम स्वत:च्या वयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. तसेच बँकेत झालेल्या गैरकारभासंबंधी व आरोपींची बँक खाती, स्थावर आणि जंगम मालमत्तेविषयी माहिती घ्यायची असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. याचसोबत आरोपींनी संबंधित रक्कमेचा वापर कशासाठी केला याचा खुलासा अद्याप होणार आहे. संबंधित बँकेतील गुंतवणुकदार, ठेवीदारांना त्यांची रक्कम परत देण्यात आल्याचे सरकारी वकील पठारे यांनी सांगितले. या संपूर्ण चौकशीसाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.