पिंपरी-चिंचवड (पुणे) : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. त्यात आतापर्यंत एकूण 91 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, 36 पोलीस कर्मचारी-अधिकारी बरे झाले आहेत. 55 कोरोनाबाधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात कोरोना चाचणी... पिंपरी पोलीस ठाण्यात चार दिवसांपूर्वी 11 पोलीस कर्मचारी, तसेच काही अधिकारी कोरोनाबाधित आढळले असल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्याच दिवशी उशिरा संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बाधित नसल्याचे समोर आले होते. असा गलथान कारभार सध्या महानगरपालिकेचा सुरू असून याबाबत कॅमेऱ्यापुढे बोलण्यास आरोग्य अधिकाऱ्यांनी नकार दिला.
हेही वाचा -लॉकडाऊनमुळे रोजगार तर गेला, पण दिव्यांग नागरिकांनी 'असा' शोधला पर्याय
मार्च महिन्यापासून शहरातील पोलीस कर्मचारी-अधिकारी हे दिवसरात्र कर्तव्य बजावताना दिसत आहेत. सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांनी सहा हजारांचा टप्पा ओलांडला असून कंटेन्मेंट झोनमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचऱ्यांनाही कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महानगर पालिका यांच्यामार्फत कर्तव्य दक्ष पोलीस कर्मचाऱ्यांची प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन कोविड टेस्ट करण्यात येत आहे.
पोलिसांना यामुळे धीर मिळत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी सांगितले आहे. सध्या भोसरी पोलीस ठाणे, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे, पिंपरी पोलीस ठाणे येथील कर्मचाऱ्यांची कोविड-19 ची टेस्ट करण्यात आली आहे.