पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरात खळबळ माजली आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला हा विषाणू भारतात देखील मोठ्या प्रमाणात पसरतोय. युरोपात इटली, स्पेन, फ्रान्स तसेच इराणमध्ये देखील विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने आणीबाणीची स्थिती निर्माण झालीय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने कोरोनाला महामारी घोषित केली आहे. चीनमध्ये डिसेंबर अखेरीस सुरू झालेल्या या संसर्गामुळे 17 मार्चपर्यंत एकूण 81,049 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर 3262 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत एका दिवसात 475 जणांचा मृत्यू झालाय. तर एकूण मृतांचा आकडा ३ हजार पर्यंत पोहचला आहे. इटलीत कोरोना बाधितांचा आकडा 47021 वर पोहोचलाय. भारतात 267 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातील 213 भारतीय आणि 38 परदेशी नागरिकांचा समावेश असून देशात आतापर्यंत चौघांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 52 वर पोहोचली असून यामुळे एकाचा मृत्यू झालाय.
कोरोना म्हणजे काय ?
कोरोना हा विषाणू असून त्याचा संसर्ग मानवात आणि प्राण्यात देखील होतो. मानवा हणाऱ्या संसर्गामुळे श्वसनाचे विकार होतात. वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूला COVID - 19 हे नाव देण्यात आलं आहे. २००३ साली कोरोना विषाणुमुळे सार्सची साथ पसरली होती. मात्र या संसर्गाची तीव्रता कमी होती.
कोरोनाचा प्रसार कसा होतो ?
संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. संसर्ग झालेली व्यक्ती शिंकल्यास, खोकल्यास बाहेर पडणाऱ्या थेंबांच्या(Droplets) संपर्कात आल्यास कोरोनाचा संसर्ग होतो. तसेच हे थेंब एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर पडल्यास आणि त्याला स्पर्श झाल्यासही रोगाचा प्रसार होतो.
कोरोनाची लक्षणं कोणती ?
सर्दी, ताप, कोरडा खोकला, थकवा येणं तसेच काही रुग्णांमध्ये घसा खवखवणे, जुलाब, अंगदुखी सारखी लक्षणं देखील आढळली आहेत. ही लक्षणे संसर्गाच्या प्राथमिक टप्प्यात आढळतात. नंतर श्वास घ्यायला त्रास होणे ते मृत्यू ओढवणं असे टप्पे आढळतात. काही व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होतो. मात्र त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळत नाहीत. त्यांना विशेष उपचारांची देखील गरज भासत नाही.
कोरोनावर उपचार कसे केले जातात ?