पुणे - मागच्या वर्षी मार्चमध्ये राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुणे शहरात आढळला. त्यानंतर पाहता पाहता राज्यात नव्हे तर देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण म्हणून पुणे शहराकडे पाहायला लागले. पण कालांतराने नोव्हेंबरनंतर शहरातील रुग्ण संख्या कमी होत गेली. पण आता पुन्हा नव्या वर्षात राज्यात कोरोना वाढत आहे. पुण्यातही कोरोना रुग्ण वाढत आहेत. कोरोनाला पुणे शहरात एक वर्ष होत असतानाही कोरोनाची दहशत अजूनही संपत नाही. सध्या पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
पुण्यात कोरोनाची दहशत कायम आतापर्यंत शहरात 1 लाख 95 हजार 496 पॉझिटिव्ह रुग्ण
मागच्या वर्षी मार्चमध्ये शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर शहरात झपाट्याने रुग्ण संख्या वाढत गेली आणि शहरात 100 हून अधिक कंटेनमेंट झोन तयार झाले. एकेकाळी तर दिवसाला 2 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण पुणे शहरात सापडत होते. आजमितीला शहरात आतापर्यंत 1 लाख 95 हजार 496 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत.
आतापर्यंत 4802 कोरोना रुग्णांचे मृत्यू
शहरात आतापर्यंत 4802 कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. वर्षभरात फक्त 1 दिवस सोडलं तर दरोरोज 3 ते 5 कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. पुणे शहरात आता काहीसा कोरोनाचा मृत्यू दर कमी झाला असला तरी आजमितीला शहरात 1 ते 2 कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत.
आजपर्यंत 1 लाख 88 हजार 975 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे शहरात कोरोनाच्या सुरुवातीपासूनच रुग्ण वाढत असले तरी मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण हे बरे होत आहेत. आजपर्यंत 1 लाख 88 हजार 975 रुग्ण बरे होऊन या रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. कोरोना रुग्ण बरे होत असले तरी शहरात कोरोना रुग्ण कमी होण्याचं काही नाव घेत नाही. लॉकडाऊननंतर हळूहळू सर्व काही पूर्वपदावर येत असले तरी मात्र शहरात कोरोनाच्या
रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे.
आता परत कोरोना रुग्णसंख्येत वाढ
राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनलॉकमध्ये हळूहळू सर्व व्यवहार, धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली आहेत. शहरात बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली. पोलीस, महापालिका प्रशासन मास्कची कारवाई करत असली तरी लोक सर्रासपणे बाजारात विनामास्क फिरत आहेत. त्यात लग्नाचं सिझन आल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करू लागले आहेत. परिणामी जी कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली होती ती पुन्हा वाढत आहे. एकही कंटेन्मेंट झोन नसलेल्या पुणे शहरात आता काही भागात सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे करावी लागतील, असा इशारा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.
शहरातील या भागात वाढत आहे रुग्णसंख्या
पुणे शहरातील नगर रस्ता, सिंहगड रोड आणि वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर वारजे, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता, औंध, बाणेर, कोथरूड आणि बावधन याही परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
महापालिका प्रशासनाने बोलावली तात्काळ बैठक
शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी महापालिका आयुक्तांसोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत सद्यस्थितीला वाढत असलेले रुग्णसंख्या आणि उपाययोजना यावर चर्चा करण्यात येईल. कोरोनाची साथ अजूनही संपलेली नाही. त्यामुळे पुणेकरांनी मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित वावर या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. शहरातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्यात तेराशेच्या आसपास असलेली सक्रीय रुग्णांची संख्या आता 1700 वर पोचली आहे. पॉझिटिव्हिटी दरही 4.6 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर गेला आहे, असे ही यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
शहरात पुन्हा चाचण्यांचे प्रमाण वाढवणार
शहरातील नगर रस्ता, बिबवेवाडी, सिंहगड रोड आणि वारजे या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सध्या रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणांची चाचणी केंद्रे, चाचण्यांचे प्रमाण आणि केंद्रावरील मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ससूनसह पालिकेच्या रुग्णालयातील 1163 खाटा उपचारांसाठी सज्ज ठेवण्यात आल्या असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
हेही वाचा -#MeToo : मानहानी प्रकरणात प्रिया रमाणी यांची निर्दोष सुटका
हेही वाचा -बाप नव्हे हा तर हैवान; पोटच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करून केला खून