पुणे -महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण पुणे शहरात आढळला होता. त्यानंतर पाहता पाहता कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत गेला. एकवेळ अशी परिस्थिती होती की देशात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पुणे शहरात होती. येथील आरोग्य व्यवस्था संपूर्णपणे कोलमडून पडली होती. कोरोनाबाधित रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका देखील मिळत नव्हत्या. परंतु या सर्व परिस्थितीवर मात करत नोव्हेंबर अखेर कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली होती. परंतु आता मागील काही दिवसांची आकडेवारी पाहिली असता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मागील आठवड्यात दररोज दीडशे-दोनशे नवे करोना रुग्ण सापडत होते. आता हा आकडा तीनशे-साडेतीनशेच्या वर गेला आहे. दहा दिवसांपूर्वी १३००च्या आसपास असलेली करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता १८०० वर गेली आहे.
रुग्णसंख्या वाढीची कारणे- कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची प्रमुख कारणे पाहिली असता यामध्ये नागरिकांना कोविड-19 चा पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेल्या नियमाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. पुणे महापालिकेसह विविध शासकीय कार्यालयापासून ते सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या अनेकांना मास्क, सॅनिटायजर आणि एकमेकांपासून सहा फुटांचे सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांचा विसर पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरात करोनाने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी जाताना ‘मास्क’ चे वावडे-
सार्वजनिक ठिकाणी जाताना नागरिक मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. रेल्वे, एसटी बस स्थानकांवर सुरक्षित अंतर राखले जात नाही. पीएमपीतील चालक, वाहकांपासून शाळकरी विद्यार्थ्यांच्या तोंडावरही ‘मास्क’ दिसत नाहीत. बँकांची कार्यालये, एटीएमबाहेरचे सॅनिटायजर गायब झाले आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्यांवरही कोरोना प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर बसवलेले दिसून येतात. सार्वजनिक ठिकाणी थर्मल गन्सद्वारे तपासणी, ग्राहकांच्या नोंदी, जागेचे वारंवार निर्जंतुकीकरण, हातमोज्यांचा वापर पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे साथरोग नियंत्रण कायद्याचे सर्रास उल्लंघन होताना दिसते.
कोरोना हॉटस्पॉट-
पुण्यातील कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना आता काही नवे हॉटस्पॉट तयार होत आहेत. यापूर्वीच्या हॉटस्पॉट मधील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी या नव्या हॉटस्पॉटमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 17 फेब्रुवारी रोजी औंध, बाणेर परिसरात सर्वाधिक 43 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल वारजे कर्वेनगर 42, कोथरूड बावधन 41, हडपसर मुंढवा 40 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे हे परिसर कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट ठरतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.
कोविड केअर सेंटरची स्थिती-
सुरुवातीच्या काळात कोविड-19 रुग्णांची संख्या वाढत असताना पुणे महानगरपालिकेने शहरात 11 कोविड केअर सेंटर आणि 16 विलगिकरण कक्ष उभारले होते. त्याशिवाय शिवाजीनगर आणि बाणेर परिसरात जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. परंतु रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर हे कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता. परंतु आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आवश्यकता भासल्यास पुन्हा ही कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येतील, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
शहरात पुन्हा चाचण्यांचे प्रमाण वाढवणार-
शहरात सध्या दररोज कोरोनाच्या तीन हजारावर चाचण्या केल्या जातात. परंतु शहरातील औंध बाणेर, हडपसर, नगर रस्ता, बिबवेवाडी, सिंहगड रोड आणि वारजे या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणांची चाचणी केंद्रे, चाचण्यांचे प्रमाण आणि केंद्रावरील मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ससूनसह पालिकेच्या रुग्णालयातील 1163 खाटा उपचारांसाठी सज्ज ठेवण्यात आल्या असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
लसीकरण वाढविण्यावर भर-
पुण्यात 16 जानेवारीपासून कोरोनावरील लसीकरणाला सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात सरकारी, निमसरकारी व खासगी क्षेत्रात काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येणार आहे. यानंतर दुसर्या टप्प्यात महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, नागरिक संरक्षण दल, गृहरक्षक दलातील अधिकारी व कर्मचार्यांना लस देण्यात येईल. यानंतर पन्नास वर्षे वयावरील जोखीमग्रस्त व्यक्तींना आणि शेवटच्या टप्प्यात सामान्य नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. यासाठी 8 ठिकाणी तयारी करण्यात आली होती. परंतु आता कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याकरिता लसीकरण केंद्र वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाने बोलावली तात्काळ बैठक-
शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी महापालिका आयुक्तांसोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत सद्यस्थितीला वाढत असलेले रुग्णसंख्या आणि उपाययोजना यावर चर्चा करण्यात येईल. कोरोनाची साथ अजूनही संपलेली नाही. त्यामुळे पुणेकरांनी मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित वावर या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. शहरातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात येणार असल्याचेही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.