महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 17, 2020, 1:45 PM IST

Updated : Dec 17, 2020, 5:49 PM IST

ETV Bharat / city

कोरोना संसर्गाचा अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांनाही फटका, मात्र लॉकडाऊनच्या काळात पुणे विभागच पुढे

अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा विचार केला तर लिव्हर, किडनी, लहान आतडे, पेंक्रियाज अशा वेगवेगळ्या अवयवांची अवयव प्रत्यारोपण तसेच अवयव दान अशा प्रक्रिया सातत्याने सुरू असतात. या अवयव प्रत्यारोपणासाठी रुग्णांना वेटिंग लिस्टनुसार अवयव उपलब्ध होत असतात.

organ
organ

पुणे -कोरोना संसर्गानंतर देशभरात लॉकडाउन करण्यात आला. याचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला. अनेक क्षेत्रांना या लॉकडाउनचा फटका बसला, त्यातलेच एक क्षेत्र म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. अतिशय किचकट आणि सुनियोजित पद्धतीने कराव्या लागणाऱ्या या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियाना लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणात फटका बसला. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा विचार केला तर लिव्हर, किडनी, लहान आतडे, पेंक्रियाज अशा वेगवेगळ्या अवयवांची अवयव प्रत्यारोपण तसेच अवयव दान अशा प्रक्रिया सातत्याने सुरू असतात. या अवयव प्रत्यारोपणासाठी रुग्णांना वेटिंग लिस्टनुसार अवयव उपलब्ध होत असतात.

संसर्गाचा धोका असल्याचे प्रमाण कमी

कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रा समोरच आव्हान निर्माण झाले. कोरोनाकाळात डॉक्टर आणि नर्स या मेडिकल स्टाफला संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने त्याचा परिणाम अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियावर झाल्याचे दिसून आले. महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे शहरामध्ये मोठ्या संख्येने अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या होत असतात. पुणे शहरात अकरा रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण शस्रक्रियेची सोय आहे. गेल्या वर्षीची तुलना केली, तर यावर्षी कोरोना संसर्गामुळे पुणे विभागात अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या निम्म्यापेक्षाही कमी झाल्या. लॉकडाऊन सुरुवातीच्या महिन्यांमध्ये तर आंतरराष्ट्रीय नियम हे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यांच्यासंदर्भात होते. तसेच या नियमांचे काटेकोर पालन करण्यासोबतच अवयवदानासाठीही कोणी समोर येत नव्हते. अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करून घ्यायलादेखील पेशंट या काळात तयार नव्हते. डॉक्टरदेखील शस्त्रक्रिया करायला तयार नव्हते.

एप्रिल महिन्यात एकही शस्त्रक्रिया नाही

या वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येक महिन्यात साधारण पाच ते सहा अवयव प्रत्यारोपण होत होत्या. मात्र लॉकडाउन लागल्यानंतर संपूर्ण एप्रिल महिन्यात एकही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. त्यानंतर मे महिन्यात हळूहळू यासाठी पुढाकार घेतला जाऊ लागला. यावर्षीच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा विचार केला, तर लॉकडाउनच्या आधीच्या तीन महिन्यात 14 अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर लॉकडाउनच्या सात ते आठ महिन्यांच्या काळात २० अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया झाल्या.

गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्म्या

एकूण या वर्षी आतापर्यंत 34 अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या, ज्या गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्म्या आहेत. गेल्या वर्षी पुणे विभागात अवयव प्रत्यारोपणाच्या 63 शस्त्रक्रिया झाल्या होत्या, असे डॉक्टर सांगतात. एकंदरीतच अवयव प्रत्यारोपणाच्या या क्षेत्रावरदेखील कोरोना संकटाचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. आता परिस्थिती हळूहळू सुधारत असून अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया पुन्हा पूर्ववत सुरू झाल्या आहेत.

Last Updated : Dec 17, 2020, 5:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details