पुणे - राज्यासह पुणे शहरातही दिवसंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ (Pune Corona Cases) होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे (Omicron Cases) वाढत असलेले रुग्ण तर दुसरीकडे कोरोनाचे देखील वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरात आज (31 डिसेंबर) 412 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक मोठी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आज झाली आहे. शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
- शहरात दिवसेंदिवस वाढत आहे रुग्णसंख्या -
पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. शहरात गेल्या काही महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. दररोज 50 ते 70 असे रुग्ण आढळून येत होते. मात्र, वाढत जाणारी गर्दी, नागरिकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात आता पुन्हा रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचा धोका तर दुसरीकडे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
- राज्यात ८ हजार ६७ नवीन कोरोनाबाधित -
आज दिवसभरात राज्यात ८ हजार ६७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. तसेच राज्यात आज १ हजार ७६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०९,०९६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के एवढे झाले आहे.