बारामती (पुणे) - कमीत कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी द्राक्षाची शेती शेतकऱ्यांनी करावी, अशी अपेक्षा जपानच्या भारतीय राजदूतातील कौन्सिल जनरल मिशिहो हाराडा यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील बैठकीत व्यक्त केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निमंत्रणावरुन हाराडा हे बारामतीत आले होते. आज सकाळी त्यांनी येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन पाहणी केली, आणि भरभरून कौतुक केले, त्यावेळी ते बोलत होते.
मिशिहो हाराडा बारामती भेटीवर हाराडा यांच्या भेटी वेळी द्राक्ष बागायतदार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, डॉ संतोष भोसले, विवेक भोईटे यांच्यासह द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
पाहणी नंतर झालेल्या बैठकीत मिशिहो हाराडा म्हणाले की, जपानमधील ओकायामा या शहरासोबत पुणे शहराचे आदानप्रदान आहे. जपानमधील ओसाका ते हिरोशिमा या पट्ट्यात द्राक्षांची उत्तम शेती केली जाते. जपानमध्ये द्राक्षाला भावही चांगला मिळतो. शरद पवार यांच्याशी जेव्हा भेट झाली, तेव्हा त्यांना मी ही बाब सांगितली, त्यानंतर त्यांनी मला बारामतीला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते.
मिशिहो हाराडा बारामती भेटीवर जपानी तंत्रज्ञानाची द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांना उपयोग-
या भागातील द्राक्ष शेतीची मी पाहणी केली. जपानमध्ये मस्कत द्राक्षे उत्तम प्रतीची आहेत. या द्राक्षाला प्रतिकिलो साठ अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास साडेचार हजार रुपये इतका भाव मिळतो. बारामती इंदापूर तालुक्यातील द्राक्षांचीही प्रत उत्तम आहे. त्यांची निर्यात करण्यासोबतच जपानमधील उच्च तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांना माहिती व्हावी, त्याचा वापर त्यांनी भारतात द्राक्षनिर्मिती करताना व्हावा, असा शरद पवार यांचा उद्देश असल्याचेही हाराडा यांनी सांगितले.
मिशिहो हाराडा बारामती भेटीवर भारतातील मेट्रो रेल्वेसह मुंबईच्या अरबी समुद्रातील मुंबई ते नवीमुंबई हा सागरी पूल उभारणीसाठी जपान सरकारचे सहकार्य मिळाले आहे. तसेच सध्याच्या कोरोना काळातही भारत सरकारला जपानने ३५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली असल्याचेही हाराडा यांनी सांगितले.
मिशिहो हाराडा बारामती भेटीवर जपानमध्येही एक शरद पवार हवेत-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात 93 साली किल्लारी येथे भूकंप झाला होता. त्यावेळी पवार यांनी नियोजनबद्ध आणि यशस्वीपणे आपतकालीन परिस्थिती हाताळली होती. या घटनेनंतर भविष्यात होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवेळी तात्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीने एन.डी.आर.एफ.सी ची स्थापना केली होती. जपान हा भूकंपाचा प्रदेश आहे. या भागात शरद पवार यांच्या सारख्या व्यक्तीची गरज आहे, असे गौरवोग्दारही हाराडा यांनी पवार यांच्या बद्दल काढले.