पुणे- क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाणार आहे. गेली अनेक वर्षे या पुरस्कारला असलेलं राजीव गांधी यांचं नाव बदलून केंद्रातील मोदी सरकारने गांधी घराण्याला असलेला विरोध दर्शवला आहे. असे म्हणत पुण्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं जावं यासाठी आपल्या देशभरातून लोकांच्या विनंती येत होत्या असं त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार त्यांच्या नावे देणं योग्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.'देशवासियांनी मांडलेल्या मतांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मेजर ध्यानचंद हे भारताला सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या भारतातील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराला त्यांचं नाव देणंच योग्य आहे' असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.