पुणे- देशात लोकशाही मार्गाने पाशवी बहुमत मिळवून नंतर राज्यघटनेला बदलायचा घाट भारतीय जनता पक्षाच्या वतीने घातला जात आहे. तसेच बरेचशे कायदे हे संविधान विरोधी तसेच जनहित विरोधी तसेच लोकशाही विरोधी होताना दिसत आहे. हे सर्वाधिक धोका का आहे तर ते संविधानिक पद्धतीने होत आहे. जर येणाऱ्या काळात पर्याय हा उभा केला नाही तर एकहाती सत्ता जी लोकशाही मार्गाने दिली आहे. ती सत्ताधाऱ्यांनी कुठल्याही मार्गाने वापरली तर आपण कोणाला दोष देणार म्हणून आज सर्वच विरोधी पक्षाची जबाबदारी आहे की सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येत या विचारसरणी विरोधात एकजूट व्हाययला पाहिजे. याच नेतृत्व काँग्रेसनेच करायला हवे. सर्वांना एकत्र पुढे घेऊन जायला पाहिजे ही काँग्रेसची जबाबदारी आहे. त्याच पद्धतीने ज्या प्रादेशिक पक्षांनी राज्यात भाजप विरोधी विजय संपादन केले आहे. अशा पक्षांनी एकत्र आले पाहिजे. भाजपला पर्याय प्रादेशिक पक्ष नव्हे तर काँग्रेसच होऊ शकते, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Congress Leader Prithwiraj Chavan ) यांनी व्यक्त केलं आहे.
काँग्रेसही स्वतःच्या बळावर भक्कम पर्याय होऊ शकत नाही -आज जी काही देशात परिस्थितीती निर्माण झाली आहे ती परिस्थिती पाहता एक भक्कम विरोधी पक्षाची गरज आहे. काँग्रेस स्वतःच्या बळावर भक्कम पर्याय होऊ शकत नाही, त्यामुळे काँग्रेसला समविचारी पक्षांची एकजूट करावी लागणार आहे, असेही यावेळी चव्हाण म्हणाले.
चिंतन व्हायला हवे होत पण ते झाले नाही -राजस्थान येथे झालेली बैठक ही चिंतन शिबिर नव्हे तर नवसंकल्प शिबीर होते. चिंतन व्हायला पाहिज होत पण ते झाले नाही. 2014 नंतर जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला हवे तसे यश मिळाले नाही. पण, अपयश हे मोठ्या प्रमाणात मिळाले. याचे चिंतन या शिबिरात व्हायला हवे होते, ते झाले नाही. पुढे काय करायला पाहिजे याबाबतच चर्चा झाली. ज्या चुका झाल्या असतील त्या चुका मान्य करून, त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता. भाजपला पर्याय उभा करण्याची जबाबदारी ही काँग्रेस पक्षाची आहे. ती जबाबदारी काँग्रेसने पार पाडली पाहिजे, असेही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्वांनी एकत्र यायला हवे, तरच त्यांचा पराभव होऊ शकतो. वेगवेगळे लढलो तर हे शक्य नाही, असेही यावेळी चव्हाण यांनी सांगितले.