पुणे - राज्यात कोरोना विषाणूने कहर सुरू केला आहे. त्याचप्रमाणे पुण्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. त्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळानं नुकतीच पालिका आयुक्तांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी उपाययोजना सुधारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावरून आता काँग्रेसने बापट यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी यांनी बापट आणि भाजपवर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. बापट यांनी पाच वर्षे पालकमंत्री असताना काय दिवे लावले. नाचता येईना आणि आंगण वाकडे, अशी भाजपची अवस्था झाल्याचा निशाणा जोशी यांनी भाजपवर साधला आहे.