पुणे - एकीकडे सत्ताधारी भाजपाच्या वतीने शहरभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी ( PM Narendra Modi Pune Visit ) करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे शहर काँग्रेसच्या वतीने 'पंतप्रधान नरेंद्र मोदी गो बॅक' असे पोस्टर लावण्यात ( Go Back Modi Banner In Pune ) आले. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा मार्चला पुणे शहर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान पुण्यातील मेट्रो आणि इतर विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी पुण्यात जोरदार विरोध होत आहे. पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने भवानी पेठ व डेक्कन परिसरामध्ये 'गो बॅक मोदी' असे पोस्टर लावण्यात आले आहे. महाराष्ट्र काँग्रेसमुळे कोरोना पसरला, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्यामुळे पुणे शहरात काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी 'गो बॅक मोदी' असे पोस्टर लावले आहे.