पुणे - शहरातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात एकहाती सत्ता असुन देखील भाजप कमी पडत आहे. शहरात कोरोनाबाबत उपाययोजना करण्यास पुणे मनपा आरोग्य प्रमुख असफल ठरत आहे. तसेच आरोग्य प्रमुखांची नेमकी भूमिका काय, हे कळत नसून त्यांची सर्व कामे आणि कर्तव्ये आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हेच पार पाडत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष आणि प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी आज (शनिवार) पुण्यातील पुणे श्रमिक पत्रकार संघातील सभागृहात हा आरोप केला.
पुणे शहरात प्रभावी उपाययोजना करण्यासाठी शहराची माहिती असलेला, स्थानिक, सक्षम, स्वतंत्र अधिकारी नियुक्त करा, अशी मागणी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुखांच्या नियुक्तीबाबत आपण राज्य सरकारकडे केल्याचे गोपाळ तिवारी यांनी यावेळी सांगीतले. यावेळी पुणे मनपा काॅंग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागूल हे देखील ऊपस्थित होते.
हेही वाचा -शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तिजोरीत खडखडाट; मंत्र्यांच्या गाड्यांसाठी उधळपट्टी
भारतीय जनता पक्षाला पुण्यातील कोरोना परिस्थिती हाताळता आलेली नाही. कोणतीही भरीव तरतूद करता आली नाही. महत्वाच्या आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्यास आरोग्य प्रमुख असफल झाले असून त्यांची नियुक्ती देखील निकषांनुसार झालेली नाही. त्यामुळे पुण्यात आरोग्य विषयक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेचे डॉ. रामचंद्र हंकारे हे आरोग्य प्रमुख पदास न्याय देण्यास असमर्थ आहेत. आरोग्य प्रमुखांनी मार्च महिन्यात अंदाज पत्रकात आग्रही वाढीव तरतूद करायला हवी होती. खासगी रुग्णालयांशी करार करण्यासारख्या गोष्टींमध्ये देखील आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना लक्ष घालावे लागत आहेत. पुणे मनपा आरोग्य प्रमुखांनी मनपाच्या आरोग्य यंत्रणा आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर अधिक लक्ष देऊन त्या सक्षम करणे गरजेचे आहे. मात्र, एकंदरीत आढावा घेतल्यास त्यांचा कल खासगी रुग्णालयांकडे असल्याचे प्रत्ययास येते, असेही गोपाळ तिवारी यांनी सांगितले.