पुणे - पिरंगुट येथील एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजी कंपनीत लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या मृत्यूला कंपनी मालकाला जबाबदार धरत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकुंज बिपिन शहा, बिपिन जयंतीलाल शहा आणि केयुर बिपिन शहा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यातील निकुंज शहा याला अटक करण्यात आली आहे. पौड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
आगीच्या या घटनेबाबत चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली होती. या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला आहे.
हेही वाचा -आता आई नाही म्हणून मुलांचे हाल होतील; मृत महिला कामगाराच्या पतीची भावना
आज(8 जून) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रीया सुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांकडूनही या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हेही वाचा -Pune MIDC Fire : कंपनी मालक निकुंज शहाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
- या कंपनीत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग यांनी दिलेल्या परवान्या व्यतिरिक्त ज्वालाग्राही पदार्थांचा साठा मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. याची माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाला देण्यात आली नव्हती.
- ज्वालाग्रही साठ्याच्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आलेली नव्हती.
- ज्वालाग्रही कच्चा माल साठवणुकीचे ठिकाण व काम करण्याची जागा एकच असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रसायनाने पेट घेऊन स्फोट झाला व आग नियंत्रणाच्या बाहेर गेली.
- कंपनीने वार्षिक विद्युत अहवाल सादर केलेला नाही.
- सॅनिटायझरच्या साठ्यामुळे आगीची तीव्रता अधिक असावी तसेच सोडियम क्लोराइडमुळे निर्माण झालेला काळा धूर हा कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर पडण्यास अडथळा ठरला.
- या कंपनीला अग्निशामक विभागाचा अंतिम ना हरकत प्रमाणपत्र दाखला करण्यात आले नाही.
- कंपनी मालकांनी 2016 ते 2020 अशी चार वर्ष शासनाच्या संमतीशिवाय उत्पादन व्यवसाय केल्याचे दिसून येत आहे.
- गठित केलेल्या चौकशी समितीने या दुर्घटनेबाबत वरील निष्कर्ष काढले आहेत. कंपनी मालकांनी अचानकपणे आग लागल्यास कंपनीतील कामगारांचा जीव जाऊ शकतो, याची जाणीव असतानाही कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक होते. असे असतानाही सदरच्या उपाययोजना न करता कंपनीतील 17 कामगार यांचा सदोष मनुष्यवध व कामगारांना जखमी होण्यास कारणीभूत झाले असल्याचा ठपका ठेवला आहे.