पुणे -आपल्या देशात क्रिकेट खेळाला प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. मात्र, लोकप्रिय असणाऱ्या फुटबॉल खेळाला त्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे क्रिकेट बरोबरच इतर खेळांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. खेळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रेक्षकांची संख्याही वाढली पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन
हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५व्या जयंतीनिमित्त शिवसेना यमुनानगर, युवासेना, सुलभाताई उबाळे सोशल फाऊंडेशनच्यावतीने यमुनानगर येथे राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोज करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्धाटन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृष्ण प्रकाश यांनी अभिवादन केले.
निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने कोणता तरी एक खेळ खेळावा
खेळाडूंना मार्गदर्शन करताना कृष्ण प्रकाश म्हणाले, आपल्या देशात क्रिकेट खेळाला प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. मात्र, जगात लोकप्रिय असणाऱ्या फुटबॉल खेळाला त्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे क्रिकेटबरोबरच इतर खेळांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. फुटबॉल खेळालाही उंची प्राप्त करून देणे आवश्यक आहे. खेळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रेक्षकांची संख्याही वाढली पाहिजे. मैदानात प्रेक्षक असतील तर खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळेल आणि खेळांना प्रायोजक मिळण्यासही मदत होईल. कबड्डीला प्रेक्षक लाभल्यानंतर प्रायोजक मिळायला सुरुवात झाली. खेळ हा नैसर्गिक आहे. त्यामुळे आपल्या निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने कोणता तरी एक खेळ खेळलाच पाहिजे, याकडे पोलीस आयुक्तांनी लक्ष वेधले. आपल्या जीवनात कधी-कधी नकारात्मकता येते. मात्र, अशावेळी खचून जाऊ नका, वाममार्गाला लागू नका. आपले कार्य आणि कर्तव्याशी बांधील राहून टीकाकारांना तुमचे कौतुक करायला भाग पाडा, असा सल्लाही कृष्ण प्रकाश यांनी दिला.
हे मान्यवर होते उपस्थित
यावेळी युवासेनेचे अजिंक्य उबाळे, आकाश सेंगर यांच्या हस्ते कृष्ण प्रकाश यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सुलभा उबाळे, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, नगरसेविका शुभांगी बोऱ्हाडे, रामभाऊ उबाळे, सचिन सानप यांच्यासह इतर कार्यकर्ते आणि खेळाडू उपस्थित होते.
हेही वाचा - आनंद महिंद्रांची टीम इंडियाच्या नव्या शिलेदारांना 'महागडी' भेट