पुणे - शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका रिक्षा चालकाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी रात्री (दि. 3 एप्रिल)रोजी घडली आहे. दरम्यान, रिक्षा चालक पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
रस्त्यावर सोडून रिक्षा चालक पसार झाला - याबाबत पीडित युवतीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवती बंडगार्डन भागातून रिक्षाने निघाली होती. रिक्षा चालकाने अश्लील वर्तन केले आणि युवतीला स्पर्श केला. युवतीने विरोध केल्यानंतर रिक्षा चालकाने तिच्या हाताला सिगारेटचा चटका दिला. त्यानंतर तिला फर्ग्युसन रस्त्यावर सोडून रिक्षा चालक पसार झाला आहे.