पुणे : प्लास्टिकच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, धातूचे कॅन्स, प्लास्टिक रॅपर अशा पुनर्वापर होणाऱ्या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी शहराच्या विविध भागात स्वच्छ एटीएम मशिन्स बसविण्यात येणार असून, या मशिन्समध्ये कचरा टाकल्यानंतर नागरिकांच्या बॅंक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने ठरलेल्या दराप्रमाणे पैसे जमा होणार आहेत. इकोमक्स गो (इं) या स्टार्टअप कंपनीच्या अभिनव योजनेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
एटीएम मशीनद्वारे संकलन
रासने म्हणाले, 'पुनर्वापर होणारा कचरा या एटीएम मशिन्समध्ये संकलित केला जाणार आहे. त्यामुळे कचरा संकलनावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी या मशिनमध्ये नागरिकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर कचर्याचा कुठला प्रकार निवडायचा आहे त्याची माहिती द्यावी लागणार आहे. प्लॅस्टिकच्या एका बाटलीसाठी एक रुपया, काचेच्या बाटलीसाठी तीन रुपये, धातुच्या कॅनसाठी प्रत्येकी दोन रुपये आणि प्लॅस्टिक रॅपर्ससाठी प्रत्येकी वीस पैसे जमा होणार आहेत.